Ad will apear here
Next
एकाच यकृताने दिले दोघांना जीवदान; पुण्यात ‘स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट’ यशस्वी
पुणे : स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट अर्थात एकाच ब्रेनडेड रुग्णाच्या यकृताचे दोन भाग करून त्यांचे दोन वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये प्रत्यारोपण करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे. पुण्यात पहिल्यांदाच झालेल्या या स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांटमुळे अनेकांना आशेचा किरण मिळाला आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया देशभरातही फारशा झालेल्या नाहीत. 

काही दिवसांपूर्वी एक २७ वर्षीय तरुण अपघातात गंभीर जखमी झाला होता. उपचार घेत असताना त्याला मेंदूमृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले. त्याच्या कुटुंबाने अवयवदानासाठी संमती दिली. त्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलमधील एका पाच वर्षीय मुलाच्या व पुण्यातील दुसऱ्या एका खासगी हॉस्पिटलमधील २६ वर्षीय महिलेच्या शरीरात या यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले. 

आरती गोखले
याबाबत पुण्यातील विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या (झेडटीसीसी) मुख्य समन्वयक आरती गोखले यांनी माहिती दिली. ‘हा एक चांगला योगायोग होता, की मला पुण्यातील दोन हॉस्पिटल्समधून रुग्णांच्या नोंदणीसाठी एकाच वेळेस विनंती करण्यात आली. दोघेही ‘सुपर अर्जंट’ प्रकारात पात्र होते. त्यांची नोंदणी प्रत्यारोपणाच्या काही दिवस आधीच झाली होती. यात दुसरा योगायोग म्हणजे दाता आणि रुग्णांचे रक्तगट एकच होते,’ असे गोखले यांनी सांगितले.

सह्याद्री हॉस्पिटल्समधील यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. दिनेश झिरपे म्हणाले, ‘हे प्रत्यारोपण ‘सह्याद्री’च्या नगररोड युनिटमध्ये करण्यात आले. आमच्या येथील रुग्ण लहान मूल असल्यामुळे त्याला प्राधान्य देण्यात आले; मात्र आम्हाला यकृताचा छोटासा भाग हवा होता. दुसऱ्या खासगी हॉस्पिटलने उर्वरित यकृत वापरून प्रत्यारोपण करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे दात्याच्या यकृतापैकी ३०० ग्रॅम म्हणजे २० टक्के यकृताचे आम्ही या लहान मुलावर प्रत्यारोपण केले. या लहान मुलाला विल्सन डिसीज झाल्यामुळे त्याचे यकृत निकामी झाले होते. या प्रत्यारोपणाला सहा तास लागले.’ 

डॉ. बिपिन विभुते
सह्याद्री हॉस्पिटल्समधील मल्टिऑर्गन ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख व यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. बिपिन विभुते म्हणाले, ‘यकृताच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या दोन रुग्णांना स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांटच्या अनोख्या पद्धतीमुळे नवजीवन मिळाले. अशा प्रकारची ही बहुधा भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असावी. यकृताचे आजार भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत चालले असून, ही एक गंभीर समस्या म्हणून पुढे येत आहे. यामुळे यकृताच्या प्रतीक्षेत अनेक रुग्ण असतात. या स्प्लिट लिव्हर शस्त्रक्रियेमुळे अशा अनेक रुग्णांना आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.’ 

सह्याद्री हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण झालेल्या या लहान मुलाची शस्त्रक्रिया ‘मिशन प्रेरणा’अंतर्गत करण्यात आली. लहान मुलांमधील अनेक असाध्य आजारांवरील उपचार सर्वांना उपलब्ध व्हावेत, या हेतूने सह्याद्री हॉस्पिटल्सतर्फे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष व रोटरी इंटरनॅशनलच्या सहयोगाने ‘मिशन मुस्कान’अंतर्गत मिशन प्रेरणा हा उपक्रम गेल्या वर्षी सुरू करण्यात आला. त्याअंतर्गत नगर रोड येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे रूपांतर एका समर्पित पेडियाट्रिक टर्शरी केअर युनिटमध्ये केले गेले आहे. लहान मुलांमधील हृदयविकार, तसेच फीट्स, रक्ताचे विकार, यकृताचे विकार अशा अनेक गंभीर आजारांवर सर्वसमावेशक उपचार तेथे उपलब्ध झाले आहेत. 

प्रत्यारोपण टीममध्ये सह्याद्री हॉस्पिटल्समधील मल्टिऑर्गन ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख व यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. बिपिन विभुते, बालरोगतज्ज्ञ डॉ. सागर लाड, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. दिनेश झिरपे आणि प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. दिनेश बाबू यांचा समावेश होता. 

स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे काय?
देशात अनेक रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज आहे आणि अवयवांचा तुटवडाही जाणवतो आहे. स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेमध्ये एका लिव्हरचे दोन भाग करून त्याचे प्रत्यारोपण दोन रुग्णांना केले जाते. त्यात यकृताचा मोठा भाग प्रौढाला, तर छोटा भाग बालकाला द्यावा लागतो. अवयव स्वीकारणाऱ्याचे वजन, रक्तगट हेदेखील निकषांनुसार जुळून आले पाहिजेत, तरच अवयवांचे भाग करता येतात. त्यामुळेच एकाच अवयवासाठी गरजूंची संख्या अधिक असताना स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांटसारखी शस्त्रक्रिया करणे फायद्याचे ठरते. 

सह्याद्री हॉस्पिटल्सचे युनिट हेड डॉ. केतन आपटे म्हणाले, ‘एकाच अवयवामुळे दोन जणांना नवजीवन मिळणे ही आनंदाची गोष्ट असून, त्यामुळे अवयवदानाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करणे गरजेचे आहे. अवयवदानाबाबत पुण्याला एक आघाडीचे शहर म्हणून नवी ओळख प्राप्त होत आहे. अवयवदानाबाबत जागृती करत राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेकांना नवे जीवन मिळू शकेल.’ 

हेही जरूर वाचा :

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZZLCD
Similar Posts
मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान पुणे : नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला कोल्हापूरमधील १८ वर्षीय तरुण दुचाकी अपघातामुळे मेंदूमृत झाला. त्याचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करण्यात आल्याने चार रुग्णांना नवजीवन मिळाले.
अवयदानामुळे पाच जणांना नवजीवन पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील एका मेंदू मृत महिलेचे अवयवदान करण्यात आल्याने पाच रुग्णांना जीवदान मिळाले. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातच ही अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे अडीच वर्षांत शंभर यकृतांचे प्रत्यारोपण पुणे : येथील ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’ने नुकतेच आपल्या डेक्कन येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शंभरावे यकृत प्रत्यारोपण केले. हे प्रत्यारोपण ‘लिव्हर सिरॉसिस’ने ग्रस्त सांगली आटपाडी येथील एका ४८वर्षीय पुरूष रूग्णावर करण्यात आले. यकृत प्रत्यारोपण यशस्वी करणार्याि तज्ज्ञांच्या समुहात ‘सह्याद्री हॉस्पिटल्स’चे
देह व अवयवदान जागृती कार्यक्रमाला प्रतिसाद पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सह्याद्री हॉस्पिटल्सच्या सहकार्याने ‘देह व अवयवदान जागृती’ या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ५० नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language